मुंबई:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एक अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. रात्रीच्या प्रवासात चालकांकडून दारू पिऊन गाडी चालवणे, प्रवाशांशी गैरवर्तन करणे आणि थांब्यांवर बस न थांबवणे अशा गंभीर तक्रारी सातत्याने येत होत्या. या घटनांना आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने ‘झिरो टॉलरन्स’ (Zero Tolerance) धोरण अवलंबले आहे. याअंतर्गत एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या ५,३०० नवीन बसमध्ये अत्याधुनिक ‘ब्रेथ ॲनालायझर’ (Breath Analyzer) यंत्र बसवण्यात येणार आहे.
या तंत्रज्ञानामुळे बस सुरू करण्यापूर्वीच चालकाच्या श्वासाची अनिवार्य तपासणी होणार आहे. बस सुरू करण्यासाठी चालकाला मशीनमध्ये फुंकर मारावी लागेल. जर चालकाच्या श्वासामध्ये अल्कोहोलचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळले, तर यंत्रणेद्वारे बसचे स्टार्टर आपोआप लॉक होईल. याचा सरळ अर्थ असा की, नशेच्या अवस्थेत चालकाला बस सुरूच करता येणार नाही आणि त्यामुळे संभाव्य अपघात आधीच टाळता येतील.
या ५,३०० नवीन साध्या आणि स्लीपर बसची बांधणी विविध कंपन्यांकडून केली जात आहे. यामध्ये ३,००० बस टाटा आणि उर्वरित बस अशोक लेलँड कंपनी बनवणार आहे. तसेच, ३०० व्होल्वो बसमध्येही ही ‘ब्रेथ ॲनालायझर’ प्रणाली असणार आहे. या सर्व बसची देखभाल संबंधित कंपन्याच करणार आहेत. टाटा आणि लेलँड ७ वर्षांपर्यंत, तर व्होल्वो १२ वर्षांपर्यंत बसचे मेंटेनन्स पाहणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माहितीनुसार, याबाबतचे कार्यादेश (Work Orders) ऑक्टोबर अखेरपर्यंत दिले जातील. जानेवारी २०२७ पासून या अत्याधुनिक आणि सुरक्षित बस रस्त्यावर उतरून प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील.








