मुंबई :
२०१६ मधील शिक्षक मारहाण प्रकरणात सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. व्ही. मानथकर यांनी तावडे यांच्या अनुपस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. एवढेच नाही तर, पुढील तारखेला होणाऱ्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर न राहिल्यास बेल बाँड रद्द करून थेट वॉरंट काढले जाईल, अशी सक्त ताकीदही न्यायालयाने त्यांना दिली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, २९ जुलै २०१६ रोजी वाकोला परिसरातील पालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला होता. या शाळेतील कर्करोगाने त्रस्त असलेल्या एका महिला शिक्षिकेची वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातील दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली होती. या बदलीला विरोध दर्शवण्यासाठी रितू तावडे आणि त्यांचे इतर सहा सहकारी शाळेत पोहोचले होते. यावेळी त्यांनी शाळेत प्रवेश करून मुख्याध्यापिका आणि इतर कर्मचाऱ्यांशी जोरदार हुज्जत घातली. याच वादावादीत दोन शिक्षकांच्या कानाखाली मारल्याचा आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप तावडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे.
या घटनेनंतर रितू तावडे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे (कलम ३५३), दुखापत करणे (कलम ३३२) आणि शांतता भंग करणे (कलम ५०४) या भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्यावर केवळ राजकीय सूडबुद्धीतून हे खोटे आरोप करण्यात आल्याचा दावा तावडे यांनी केला होता. मात्र, साक्षीदारांनी दिलेले जबाब आणि पोलिसांकडे उपलब्ध असलेले पुरावे पाहता न्यायालयाने त्यांना दोषमुक्त करण्यास स्पष्ट नकार देत खटला चालवण्याचे आदेश दिले होते.
विशेष म्हणजे, आरोप निश्चितीसाठी सुरू असलेल्या या खटल्याच्या मागील सुनावणीलाही तावडे गैरहजर राहिल्या होत्या, त्यावेळी न्यायालयाने त्यांना ३०० रुपयांचा दंड सुनावला होता. आता पुन्हा एकदा सुनावणीकडे पाठ फिरवल्याने न्यायालयाने अधिक कठोर भूमिका घेत एक हजार रुपयांचा दंड आणि कारवाईचा इशारा दिला आहे.






