लांजा : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ (ता. लांजा) असलेल्या तीव्र उताराच्या धोकादायक वळणावर गुरुवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास दोन कंटेनरची जोरदार धडक झाली. या अपघातात एका कंटेनरचा चालक जखमी झाला असून, महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने मदतकार्य करत वाहतूक पूर्ववत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक जावेद मलिक (रा. सारंगपूर, उत्तर प्रदेश) हे आपला कंटेनर (HR 84 4562) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होते. अंजणारी पुलाजवळील उतारावर त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यांचा कंटेनर पुढे चाललेल्या दुसऱ्या एका कंटेनरला (MH 46 DL 7111) जाऊन धडकला. या धडकेत चालक जावेद मलिक किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जखमी चालकाला तत्परतेने पाली येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सुरक्षेसाठी बॅरिकेड्स लावले आणि क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.



