मुंबई/पुणे:
महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) ने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेच्या रडारवर राज्यातील प्रसिद्ध ‘सोनई’ दूध डेअरीही आली आहे. एफडीएच्या पथकाने भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे पुरवठादार, दूध संकलन केंद्रे आणि चिलिंग सेंटर्सची सखोल तपासणी केली आहे.
पुण्याच्या मंचर परिसरातील मेसर्स नवकार डिस्ट्रीब्यूटर्सवर ४ जुलै रोजी टाकलेल्या छाप्यात व्हे पावडर (Whey Powder), डिटर्जंट आणि इमल्सीफायर यांसारखी हानिकारक रसायने जप्त करण्यात आली. या गंभीर प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करून २५ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, मेसर्स आकाश डेअरी फार्ममधून घेतलेल्या दुधाच्या सर्व सहा नमुन्यांमध्ये घातक डिटर्जंट आढळून आले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालात ‘नोनिलफिनोल एथोक्सिलेट’ (Nonylphenol ethoxylate) सारख्या रसायनाचीही पुष्टी झाली आहे. याशिवाय, अथर्व मिल्क इंडस्ट्रीजच्या दुधाच्या नमुन्यातही डिटर्जंट आढळल्याने ते मानवी सेवनासाठी पूर्णपणे असुरक्षित घोषित करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्येही एफडीएने बडगा उगारला आहे. येथे महालक्ष्मी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आणि डेलीविश ॲग्रो डेअरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडवर कठोर कारवाई करण्यात आली. पथकाने येथे अनुक्रमे ७,६३४ आणि ९,०९६ लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट केले. नष्ट करण्यात आलेल्या एकूण १६,७३० लिटर दुधाची अंदाजित किंमत ६.६९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.







