ठाणे : अशोक घाग
ठाकरे गटाचे निष्ठावान पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सांत्वनपर भेटीनंतर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंना पाहताच कुटुंबीयांचा भावनांचा बांध फुटला आणि त्यांनी एकच आक्रोश केला. ठाकरेंनी प्रदीप यांचा मुलगा राम पूर्णेकर यांच्याशी संवाद साधत, ‘खचून जाऊ नका, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,’ असा धीर दिला. हत्येची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी कुटुंबीयांनी केली. परिसरात उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘न्याय हवा’ आणि ‘पूर्णेकर अमर रहे’ अशा घोषणा दिल्या.
या प्रकरणाचे लवकरात लवकर आरोपपत्र दाखल झाले पाहिजे आणि त्यात शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांच्या नावाचा स्पष्ट समावेश असावा, अशी आक्रमक मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. संजय राऊत ठाण्यात आल्यानंतरच एफआयआरमध्ये त्यांचे नाव नोंदवले गेले, असा दावाही त्यांनी केला. या सांत्वनपर भेटीच्या वेळी मिलिंद नार्वेकर, राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव उपस्थित होते.
दुसरीकडे, या हत्या प्रकरणात पूर्णेकर यांचा मित्र पप्या शिंदे याने आरोपींना मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ठाणे गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच, चौकशीसाठी दोन महिलांसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. फरार आरोपींच्या संपर्कातील व्यक्तींची कसून चौकशी सुरू असून लवकरच मुख्य सूत्रधारांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.









