चिपळूण : प्रतिनिधी
उत्तर रत्नागिरीतील उर्वरित तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा आणि ‘एसआयआर’ प्रक्रियेत मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळली जात असल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने ७ ऑक्टोबर रोजी चिपळूणमध्ये विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार भास्कर जाधव यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
हा मोर्चा सकाळी १० वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होईल आणि प्रांत कार्यालयावर धडकेल. पत्रकार परिषदेत आमदार जाधव यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच, ‘एसआयआर’ प्रक्रियेत मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून निवेदनाद्वारे केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, कमी पावसाचा मोठा फटका बसलेल्या उत्तर रत्नागिरीतील अन्य तालुक्यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. या अन्यायकारक निर्णयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधून या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची प्रमुख मागणी या मोर्चात केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, काँग्रेसचे भरत लब्धे, महादेव चव्हाण, सुभाष जाधव, सचिन बात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश केळकर, शिरीष काटकर यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






