मुंबई :
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) मुंबईतील शिवाजी पार्क येथे केलेले आंदोलन त्यांना महागात पडले आहे. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर पोलिसांची परवानगी नसतानाही सीजेपी कार्यकर्त्यांनी ‘जेल भरो’ आंदोलन केले, ज्यामुळे मुंबई पोलिसांनी कठोर भूमिका घेत ५०० आंदोलकांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवार दुपारनंतर शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी, कार्यकर्ते आणि समर्थक जमा झाले होते. यावेळी ‘ग्यानू मस्ट गो’ (Gyanu Must Go) आणि ‘सेव्ह डेमोक्रसी’ (Save Democracy) च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आशुतोष रांका, सौरभ दास, आफरीन नवाज, सोम्या कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मळगी आणि योगेश इंगळे यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रामुख्याने निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढवली जाईल, असे दिपके यांनी स्पष्ट केले. त्यांनी मुंबईनंतर गोवा, बंगळुरू आणि कोलकाता यांसारख्या शहरांमध्येही निदर्शने करण्याची आणि शेवटी दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. गांधी जयंतीच्या दिवशी नागरी अधिकारांसाठी आवाज उठवणे हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली असल्याचे दिपके म्हणाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत शिवाजी पार्क मैदानावर ही निदर्शने करण्यात आली होती. परवानगी नसतानाही मोठी गर्दी जमवणे, सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे सभा घेणे आणि मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवणे या आरोपांखाली शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आंदोलकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम १८९(२) आणि २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७(१), (३) आणि १३५ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली आहे.








