दापोली (प्रतिनिधी):
भातपिकाची जोमदार वाढ आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी युरियाचा योग्य वेळी व अचूक पद्धतीने वापर कसा करावा, याविषयी मुगीज येथे ‘बीजांकुर गटा’च्या वतीने एका विशेष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण उपक्रमात परिसरातील सहा प्रयोगशील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
या प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांना खत व्यवस्थापनावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. भातपिकाच्या वाढीच्या टप्प्यांनुसार युरियाचा वापर करणे आवश्यक आहे. खत देण्यापूर्वी शेतातील अतिरिक्त साचलेले पाणी बाहेर काढावे व युरिया संपूर्ण क्षेत्रात समान प्रमाणात विखुरावा. युरियामुळे पिकाला आवश्यक नत्र मिळते, ज्यामुळे पिकाची वाढ जलद होते, पानांचा हिरवेपणा टिकून राहतो आणि उत्पादक फुटव्यांची संख्या वाढण्यास मोठी मदत होते. याचा सकारात्मक परिणाम भाताच्या एकूण उत्पादनावर होतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
तसेच, अतिवृष्टी सुरू असताना खतांचा वापर टाळावा. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून खत दिल्याची तारीख व प्रमाणाची नोंद ठेवावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. हे प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विशेषज्ञ डॉ. विरेश चव्हाण, डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.






