रत्नागिरी : प्रतिनिधी
‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पथक रत्नागिरी शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना, मच्छी मार्केट चर्च रोड परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी या इसमाची कसून चौकशी केली असता, त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला ‘ब्राऊन हेरॉईन’ हा अंमली पदार्थ सापडला. या कारवाईत पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एकूण १ लाख ११ हजार रुपये किमतीचा ब्राऊन हेरॉईन जप्त केला आहे.
ही धडक कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने केली आहे. शहरात सलग होत असलेल्या या कारवायांमुळे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.






