रत्नागिरी : प्रतिनिधी
मिशन फिनिक्स अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पथक रत्नागिरी शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना, आठवडा बाजार परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. सदर इसमाची कसून चौकशी केली असता, त्याच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून एकूण १,३६,००० रुपये किमतीचा ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
ही धडक कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



