रत्नागिरी : प्रतिनिधी
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गुडघ्यातील तुटलेल्या एसीएल लिगामेंटची दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयात ज्या उपचारांसाठी लाखोंचा खर्च येतो, तीच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया येथे पूर्णपणे मोफत झाल्याने रुग्णाला मोठा दिलासा मिळाला आहे.
कराड येथील रहिवासी पांडुरंग सोपान काशीद (३८) यांना दोन महिन्यांपूर्वी गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीत त्यांच्या उजव्या गुडघ्यातील एसीएल लिगामेंट तुटल्याने त्यांना असह्य वेदना होत होत्या. चालताना आणि पायऱ्या चढताना गुडघा लचकण्याचा त्रास होत होता. इतरत्र उपचार घेऊनही फरक न पडल्याने त्यांनी रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील अस्थिरोग विभागात धाव घेतली. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखिल देवकर यांनी तपासणीअंती २९ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर आर्थ्रोस्कोपिक एसीएल लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या प्रक्रियेत तुटलेल्या लिगामेंटच्या जागी नवीन लिगामेंटची यशस्वी पुनर्रचना करण्यात आली.
या मोफत व दर्जेदार उपचारामुळे पांडुरंग काशीद यांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, डॉ. देवकर, भूलतज्ज्ञ डॉ. जमशेर व डॉ. ऐश्वर्या यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय टीमचे मनःपूर्वक आभार मानले. शासकीय रुग्णालयात सर्वसामान्यांना मिळणाऱ्या या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेबद्दल रुग्णालयाच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.







