पुणे :
पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी आता कडक भूमिका घेतली आहे. पुणे पोलिसांनी नवी पेठ येथील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेले धरणे आंदोलन तात्काळ संपवून जागा रिकामी करण्याचे थेट आदेश दिले आहेत. सुरक्षेचा प्रश्न आणि मोठ्या प्रमाणावरील वाहतूक कोंडीचे कारण देत पोलिसांनी या आंदोलनाची परवानगी नाकारली आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमावबंदी (प्रतिबंधात्मक आदेश) लागू असतानाही १ ऑक्टोबरपासून विनापरवाना हे आंदोलन सुरू होते. पोलिसांच्या नोटीसनुसार, या आंदोलनामुळे मध्य पुण्याची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तसेच ‘पुणे बंद’ सारखी प्रक्षोभक विधाने करून विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि विद्यार्थ्यांच्या बैठकीत मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याबाबतचे पत्र देण्यात आले होते. तसेच, रस्ते आणि पूल अडवून सर्वसामान्यांना वेठीस धरू नये, असे कडक निर्देश मुंबई उच्च न्यायालयानेही दिले होते. उच्च न्यायालयाची हीच भूमिका आणि बीएनएसएस (BNSS) च्या कलम १६३ अंतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
असे असले तरी, प्रशासनाने लवचिक भूमिका घेत म्हटले आहे की, जर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यासाठी रीतसर अर्ज केला, तर त्यावर विचार केला जाईल. आता पोलिसांच्या या कठोर पावलानंतर विद्यार्थ्यांच्या पुढच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.



