मुंबई : दिक्षा भागवत
मनसेतून बडतर्फ झाल्यानंतर भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले कोकणातील नेते वैभव खेडेकर यांनी भाजपचे महत्वाचे नेते प्रवीण दरेकर आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खेडेकर यांचा पक्षप्रवेश काही कारणांमुळे लांबणीवर पडला होता, मात्र या भेटीमुळे आता हा रखडलेला प्रवेश मार्गी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरेकरांची घेतली भेट, अभिनंदनासह राजकीय चर्चा!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव खेडेकर यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. दरेकर यांची ‘स्वयंपूर्ण विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी’ नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. मात्र, ही केवळ सदिच्छा भेट नव्हती. तर या भेटीत खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे. खेडेकर यांचा प्रवेश लवकरच व्हावा यासाठी दरेकर यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे बोलले जाते.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांशीही संवाद
प्रवीण दरेकर यांच्या भेटीनंतर वैभव खेडेकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही भेट घेतली. कोकणातील राजकारणावर आणि आगामी वाटचालीसंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. यापूर्वीच भाजपच्या काही नेत्यांनी खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली होती, मात्र काही अंतर्गत कारणांमुळे तसेच राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे हा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. प्रदेशाध्यक्षांशी झालेल्या भेटीमुळे आता प्रवेशाचा निश्चित मुहूर्त लवकरच ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘वेटिंगवर’ असलेल्या प्रवेशाला मिळणार ‘ग्रीन सिग्नल’?
मनसेमधून हकालपट्टी झाल्यानंतर वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात होता. त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात तयारी देखील केली होती, मात्र प्रवेश लांबल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. आता दरेकर आणि चव्हाण या दोन्ही बड्या नेत्यांशी झालेल्या भेटीमुळे, ‘वेटिंगवर’ असलेला त्यांचा भाजप प्रवेश आता ‘ग्रीन सिग्नल’ने मार्गी लागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोकणातील राजकारणाच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा ठरू शकतो.







