रत्नागिरी : प्रतिनिधी
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना थेट मिळवून देण्यासोबतच संच मान्यता पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या आधार पडताळणी मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील तब्बल ९८.२१ टक्के विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे. या मोहिमेत संगमेश्वर आणि लांजा तालुक्यांनी विशेष आघाडी घेतली असून, उर्वरित प्रलंबित कामही युद्धपातळीवर सुरू असल्याने लवकरच रत्नागिरी जिल्हा या प्रक्रियेत राज्यात अव्वल स्थानी झेपावण्याची शक्यता आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवास सुलभरीत्या ट्रॅक करण्यासाठी आणि माहितीची अचूकता राखण्यासाठी राज्य व देशपातळीवर ‘युडीआयएसई प्लस’ प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची माहिती नोंदवण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या ऑगस्ट महिन्यातील आकडेवारीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १ लाख ९१ हजार ६८२ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. यापैकी १ लाख ९१ हजार ८५ विद्यार्थ्यांचे आधार उपलब्ध झाले असून, त्यातील १ लाख ८८ हजार ४० विद्यार्थ्यांची आधार पडताळणी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. सध्या जिल्ह्यात केवळ २ हजार ५४९ विद्यार्थ्यांची पडताळणी प्रलंबित असून, हे अडीच हजार विद्यार्थ्यांचे कामही तातडीने पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.







