रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील तेली आळी येथील एका चार्टर्ड अकाऊंटंटला (सीए) अज्ञात सायबर भामट्याने तब्बल ५ लाख ६६ हजार ४४१ रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भामट्याने फिर्यादीच्या वडिलांचा मोबाईल हॅक करून कॅनरा बँकेच्या खात्यातून ही मोठी रक्कम परस्पर वळती केली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपिन रसिकलाल शहा (वय ५७, रा. बन्सी बंगला, पार्क ओपल, शिवाजीनगर) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. २६ सप्टेंबर रोजी रात्री सव्वाआठ ते पावणेनऊच्या सुमारास शहा हे तेली आळी येथील त्यांच्या कार्यालयात काम करत होते. याचदरम्यान अज्ञात भामट्याने त्यांच्या वडिलांचा मोबाईल हॅक केला. या हॅक केलेल्या मोबाईलच्या आधारे भामट्याने कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड मिळवले. त्यानंतर या कार्डचा वापर करून शहा यांच्या कॅनरा बँकेतील संयुक्त खात्यातून दोन लाख रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळते केले. एवढ्यावरच न थांबता भामट्याने मोबाईल बँकिंगचा गैरवापर करत ३ लाख ६६ हजार ४४१ रुपयांचे क्रेडिट कार्डचे बिलही याच खात्यातून भरून घेतले.
आपली साडेपाच लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विपिन शहा यांनी तात्काळ रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून २७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलम ६६ (क), ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल हॅकिंग आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून झालेल्या या मोठ्या फसवणुकीमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलीस या सायबर गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.





