रत्नागिरी:
कथित ‘व्होट चोरी’ प्रकरण आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी (उत्तर-दक्षिण) आक्रमक झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता रत्नागिरीत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. “ज्ञानेश कुमार हटावा, लोकशाही वाचवा!” अशी हाक या आंदोलनातून देण्यात आली आहे.
सध्या देशात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे अन्य दोन आयुक्तांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोगाची ही कार्यपद्धती म्हणजे लोकशाहीची आणि संविधानाची हत्या असल्याचे सांगत पक्षाकडून याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी हा लढा सुरूच राहील, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
सोमवारी सकाळी १०:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी पुकारलेल्या या लढ्यात जिल्ह्यातील सर्व संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर आणि प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलिपे यांनी केले आहे.






