रत्नागिरी : प्रतिनिधी
राज्यात सध्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या धडक कारवायांची जोरदार चर्चा सुरू असतानाच, रत्नागिरीतही एका प्रशासकीय अधिकाऱ्याने गुन्हेगारी जगतात मोठी धडकी भरवली आहे. अंमली पदार्थांचे जाळे मुळासकट नष्ट करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, त्याला महसूल प्रशासनाने तितक्याच आक्रमकतेने पाठबळ दिले आहे. रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी अंमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्या आरोपींवर कोणतीही दयामाया न दाखवता थेट हद्दपारीचा बडगा उगारला आहे. २०२३ पासून आजतागायत त्यांनी ‘नार्कोटिक ड्रग्ज ॲण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट, १९८५’ (NDPS Act) अंतर्गत तब्बल २१ जणांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
या मोहिमेअंतर्गत प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी २३ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी मोठी कारवाई करत एनडीपीएस कायद्यान्वये सहा जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले. यामध्ये सचिन राजाराम म्हापूसकर, अरमान लियाकत धामस्कर, नजब असीफ मिरजकर, मस्तान मकदुम शेख, फुरकान यासिन फणसोपकर आणि अब्दुल रौफ इक्बाल डोंगरकर या सहा जणांचा समावेश आहे. एकाच दिवशी झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आणि अमली पदार्थांच्या काळ्या धंद्याला पायबंद घालण्यासाठी प्रशासनाने शून्य सहिष्णुतेचे धोरण अवलंबले आहे. २०२३ पासून सुरू झालेल्या या कारवाईच्या सत्रात आजअखेर २१ जणांना तडीपार करण्यात आले असून, समाजविघातक कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.



