रत्नागिरी : प्रतिनिधी
संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धडक मूकमोर्चा काढण्यात आला. ईव्हीएम आणि ‘एसआयआर’ प्रक्रियेतून मतचोरी होत असल्याचा दावा करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी साडेअकरा वाजता या मूकमोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रमेश कीर, सरचिटणीस हुस्नबानू खलिफे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जमीर खलिफे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना रमेश कीर यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ‘निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली तरी ‘एसआयआर’च्या नावाखाली मोठा गोंधळ सुरू आहे. खुद्द आयुक्तांच्या निर्णयांवर त्यांच्या सहकाऱ्यांचा आक्षेप आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यावर सातत्याने आवाज उठवत आहेत.’ हे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवून आयुक्तांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.
हा मोर्चा २ ते ८ ऑक्टोबर दरम्यानच्या ‘लोकशाही बचाव आंदोलना’चा भाग असल्याचे हुस्नबानू खलिफे यांनी सांगितले. काँग्रेसने प्रामुख्याने तीन मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. पारदर्शकतेसाठी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, मतदारांना वंचित ठेवणारी ‘एसआयआर’ प्रक्रिया तत्काळ रद्द करावी आणि या गोंधळाला जबाबदार असलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे.




