आंबा, काजू, नारळ आणि सुपारी उत्पादकांना मोठा दिलासा
रत्नागिरी : प्रतिनिधी
बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादनात होणारी घट आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सोसावे लागणारे नुकसान लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात सन २०२६-२७ या वर्षासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू, नारळ आणि सुपारी या चार प्रमुख फळपिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, बागायतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या पिकांना विमा संरक्षण मिळवून द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंबा पिकाचा विमा संरक्षण कालावधी १५ मे ऐवजी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला असून, शेतकऱ्यांचा विमा हप्ता हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांवरून थेट ८ हजार ५०० रुपये इतका कमी करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत प्रतिहेक्टर संरक्षित रक्कम आणि शेतकरी हप्ता निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार आंब्यासाठी १ लाख ७० हजार रुपयांच्या संरक्षणासाठी ८ हजार ५०० रुपये, नारळासाठी १ लाख ७० हजार रुपयांच्या संरक्षणासाठी ८ हजार ५०० रुपये, काजूसाठी १ लाख २० हजार रुपयांच्या संरक्षणासाठी ६ हजार रुपये, तर सुपारीसाठी १ लाख रुपयांच्या संरक्षणासाठी ५ हजार रुपये हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे.
जिल्ह्यातील अधिसूचित ८३ महसूल मंडळांमध्ये आंबा व काजू, ५३ मंडळांमध्ये नारळ आणि २३ मंडळांमध्ये सुपारीसाठी ही योजना लागू राहील. या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार दोन्ही शेतकरी सहभागी होऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे ‘ॲग्रीस्टॅक’ अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक असणे आणि ‘ई-पीक पाहणी’ भ्रमणध्वनी आज्ञावलीद्वारे पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे. शेतकरी ‘आपले सरकार सेवा केंद्र’, बँक किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून हप्ता भरू शकतात. अर्जासोबत बागेचे भौगोलिक स्थान दर्शवणारे छायाचित्र संकेतस्थळावर जोडणे आवश्यक आहे.
नारळ व सुपारी पिकांसाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ असून, आंबा व काजू पिकांसाठी ३० नोव्हेंबर २०२६ ही अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी अखेरच्या दिवसांची वाट न पाहता तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.



