खेड : प्रतिनिधी
बालरंगभूमी परिषदेच्या वतीने आयोजित ‘जल्लोष लोककलेचा २०२६’ या उपक्रमांतर्गत पार पडलेल्या राज्यस्तरीय एकल गायन स्पर्धेत कु. प्रथमेश संदीप दोडेकर याने आपल्या सुमधुर आणि दमदार गायकीच्या जोरावर राज्यात प्रथम क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
लातूर येथे संपन्न झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या अनेक गुणवंत स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या चुरशीच्या स्पर्धेत प्रथमेशने आपल्या सुरेल आणि प्रभावी सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांसह परीक्षकांची मने जिंकून अव्वल स्थान पटकावले.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रसिद्ध मराठी चित्रपट, मालिका व नाट्य अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत, ‘सा रे ग म प’चे विजेते गायक मंगेश बोरगावकर तसेच लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या हस्ते प्रथमेशला पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. लातूरच्या रंगमंचावर आपल्या कलेचा डंका वाजवून तालुक्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या प्रथमेश दोडेकरवर सध्या सर्व स्तरांतून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



