दापोली : ज्योती बिवलकर
दापोली तालुक्यातील प्रस्तावित भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्प, चिखलगाव येथील बॉक्साईट उत्खनन प्रकल्प तसेच देवके नवेनगर प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. निसर्गसंपन्न दापोलीच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या या विनाशकारी प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शवत तालुक्यातील शेकडो ग्रामस्थांनी दापोली तहसील कार्यालयावर धडक दिली. या वेळी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अर्चना बोंबे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या हरकती व मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.
भिवबंदर येथे प्रस्तावित असलेला अणुऊर्जा प्रकल्प दापोलीच्या पारंपरिक अर्थव्यवस्थेला आणि समृद्ध पर्यावरणाला घातक ठरेल, अशी तीव्र भीती ग्रामस्थांनी या वेळी व्यक्त केली. या प्रकल्पामुळे परिसरातील सुपीक शेती, आंबा-काजू बागायती, पारंपरिक मासेमारी आणि भरभराटीस आलेला पर्यटन व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली. नैसर्गिक साधनसंपत्तीची अतोनात हानी करून लादला जाणारा हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
दुसरीकडे, चिखलगाव परिसरातील डोंगररांगांमध्ये प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट उत्खननालाही स्थानिक जनतेने कडाडून विरोध दर्शवला आहे. खाणकामामुळे येथील भूजल पातळी, शेतजमिनी आणि पर्यावरणाचा समतोल बिघडणार असल्याचा आरोप करत परिसरातील महिला मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात दाखल झाल्या होत्या. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या आंदोलनाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. स्थानिक नागरिकांचे हक्क आणि पर्यावरणाचे संवर्धन राखूनच शाश्वत विकास साधला गेला पाहिजे, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली.
कोणताही प्रकल्प पुढे नेण्यापूर्वी प्रशासनाने स्थानिक जनतेला विश्वासात घेणे आवश्यक आहे. या प्रकल्पांचे पर्यावरणीय आणि सामाजिक दुष्परिणाम नेमके काय होतील, याची खुली माहिती जनतेसमोर मांडली जावी आणि स्थानिकांच्या हरकतींची रीतसर दखल घेतली जावी, अशी जोरदार मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दापोलीतील या तीनही प्रकल्पांबाबत ग्रामस्थांनी आपला संघटित विरोध प्रशासनासमोर स्पष्टपणे नोंदवला असून, आता शासन आणि स्थानिक प्रशासन या निवेदनावर काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



