रत्नागिरी : प्रतिनिधी
विलवडे रेल्वे स्थानकावर अधिकाधिक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा आणि प्रवाशांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणाला मोठे यश आले आहे. विलवडे रेल्वे प्रवासी संघटना (मुंबई) आणि ग्रामीण संघर्ष समितीच्या वतीने रविवारी आयोजित या एकदिवसीय आंदोलनाची दखल घेत, कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने सुविधा पुरविण्याचे आणि गाड्यांच्या थांब्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. या आंदोलनाला परिसरातील तब्बल ७० हून अधिक गावांतील रेल्वे प्रवाशांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
लांजा आणि राजापूर तालुक्यांच्या सीमेवर असलेले विलवडे रेल्वे स्थानक हे दळणवळणाचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. या स्थानकावर लांजा, राजापूरसह अणुस्कुरा घाटमाथा आणि वैभववाडी तालुक्यातील अनेक गावे अवलंबून आहेत. मात्र, येथे अपेक्षित प्रमाणात एक्स्प्रेस गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांना पुढील स्थानक गाठावे लागते किंवा खासगी वाहनांचा महागडा पर्याय निवडावा लागतो. याशिवाय स्थानकावर केवळ एकच फलाट असल्याने होणारी गैरसोय, दुरवस्थेतील प्रतीक्षागृह, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत होते. या सर्व प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते.
प्रवाशांचा वाढता रोष आणि आंदोलनातील मोठा सहभाग पाहता कोकण रेल्वेचे अधिकारी आंबर्डेकर आणि अहिरे यांनी लांजाचे तहसीलदार ढोले यांच्या उपस्थितीत आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रतीक्षागृह फलाटाला जोडून बांधणे, रॅम्पची व्यवस्था करणे आणि समतल मार्गावर दिव्यांची सोय करणे ही कामे लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. तसेच रस्त्यावरील दिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत करणे आणि ड्रेनेजची उघडी टाकी बंदिस्त करण्याचे काम पुढील पंधरा दिवसांत पूर्ण केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. दुसऱ्या फलाटाच्या निर्मितीसाठीही पुढील महिन्यात प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाने मान्य केले.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोचुवेली आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांना विलवडे येथे थांबा देण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावाची सत्यप्रत अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला सोपवली. प्रशासनाच्या या आश्वासनांनंतर शिष्टमंडळाने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाची हालचाल न दिसल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रवाशांनी दिला आहे. चोख पोलीस बंदोबस्तात हे आंदोलन शांततेत आणि यशस्वीरीत्या पार पडले.



