रत्नागिरी : प्रतिनिधी
पती-पत्नीचा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी सांगलीहून आलेल्या मध्यस्थांची क्रूझर गाडी रागाच्या भरात जावयानेच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात घडली आहे. शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरातील एका लॉजच्या पार्किंगमध्ये गुरुवारी (१७ सप्टेंबर) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश चंद्रकांत खेत्री (रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जावयाचे नाव आहे. याप्रकरणी अशोक नागाप्पा गोठेकर (वय २७, रा. कडेगाव, जि. सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोठेकर यांचे मित्र अशोक बागडे यांच्या मुलीचा आणि जावयाचा (आकाश खेत्री) वाद सुरू होता. हा कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी बागडे यांनी गोठेकर यांना मोठी गाडी घेऊन रत्नागिरीला बोलावले होते. त्यानुसार, राहुल काटकर यांच्या मालकीची क्रूझर गाडी (एमएच-10-बीएन-7152) भाड्याने घेऊन ते बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी रत्नागिरीत पोहोचले. दोन्ही कुटुंबांत चर्चा झाल्यानंतर, हा वाद शहर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकाऱ्यांसमोर सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री उशीर झाल्याने सांगलीहून आलेली सर्व मंडळी आठवडा बाजार येथील एका लॉजवर मुक्कामासाठी थांबली होती.
गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लॉजमधील कर्मचाऱ्याने गोठेकर यांना पार्किंगमधील गाडीला आग लागल्याची माहिती दिली. सर्वजण खाली आले असता अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेनंतर लॉजचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित आकाश खेत्री याने रागाच्या भरात प्रथम गाडीच्या काचा फोडल्या आणि त्यानंतर पेट्रोल किंवा तत्सम ज्वलनशील पदार्थ टाकून गाडी पेटवून दिल्याचे निष्पन्न झाले.
या आगीत गाडीचे सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही पुराव्याच्या आधारे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.



