संगमेश्वर : प्रतिनिधी
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार महत्त्वपूर्ण साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी चक्क गणपती बाप्पाचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामा’च्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर फेसबुक रेल्वे ग्रुप या सोशल मीडिया ग्रुपकडून हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्टेशन मास्तरांकडे असलेल्या तक्रार वहीत या मागणीची रीतसर नोंद करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त कोकणात दाखल झालेले हजारो चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर स्थानकावरील प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या गाड्यांना तातडीने थांबे मिळावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
या अनोख्या आंदोलनात १०११५/१०११६ बांद्रा-मडगाव एक्सप्रेस, १६३११/१६३१२ श्री गंगानगर एक्सप्रेस, १२९७७/१२९७८ अजमेर-एर्नाकुलम एक्सप्रेस आणि ०२१९७/०२१९८ जबलपूर-कोयंबतूर एक्सप्रेस या चार गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली. या गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळाल्यास संगमेश्वर तालुक्यासह परिसरातील प्रवाशांना मुंबई, राजस्थान, उत्तर भारत, केरळ, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी थेट आणि सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे.
या महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून भारतीय रेल्वे बोर्डाकडे रीतसर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नाईलाजास्तव हे अनोखे आंदोलन करण्यात आल्याची माहिती कार्यकर्ते संदेश जिमण यांनी दिली. ‘उंदीरमामा’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या या लक्षवेधी तक्रारीची सध्या रेल्वे स्थानक परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.









