रत्नागिरी : प्रतिनिधी
आगामी काळात जिल्ह्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाई निवारणाच्या कामात कुचराई किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे सक्त निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत. तसेच, येत्या ९ तारखेपर्यंत सर्व भागांचे पाणीटंचाई कृती आराखडे प्रशासनाने विनाविलंब सादर केलेच पाहिजेत, असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे.
पंचायत समिती रत्नागिरीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या लोकनेते कै. शामराव पेजे सभागृहात पाणीटंचाई कृती आराखड्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह सर्व सभापती, सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून भविष्यात पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष जाणवण्याची शक्यता आहे. हे संभाव्य संकट लक्षात घेऊन जिल्ह्यात युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. पाणीटंचाईकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी अत्यंत डोळसपणे पाहण्याची गरज व्यक्त करत, आपापसातील राजकीय मतभेद व आंदोलने बाजूला ठेवून जनतेच्या हितासाठी सर्वांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. सामंत यांनी केले.
याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जास्तीत जास्त पाणी अडवण्यासाठी एक व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. येत्या १५ तारखेला सकाळी ठीक ८ वाजता एकाच वेळी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून संपूर्ण जिल्ह्यात तब्बल १० हजार वनराई बंधारे बांधण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प या बैठकीत करण्यात आला आहे. यासोबतच जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी ५० नव्या विहिरींना मंजुरी देण्यात आली असून, या कामासाठी प्रतिविहीर १२ लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रत्नागिरी शहरासह जिल्ह्याचा पुढील शंभर वर्षांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरही या बैठकीत ठोस चर्चा झाली. समुद्राचे खारे पाणी गोड करून पाणीपुरवठा करण्याच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) लवकरच जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची आश्वासक माहिती पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी दिली.



