रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ठरला आहे. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव आणि ऐतिहासिक टिळक विद्यालयाच्या पुनर्बांधणीचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. रत्नागिरीसारख्या लहान शहरात केंद्रीय विद्यालय होऊ शकत नाही, अशी टीका करणाऱ्यांना आम्ही प्रत्यक्ष काम पूर्ण करून उत्तर दिले आहे, असे सडेतोड प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी केले. तसेच, रत्नागिरीला भविष्यात एक भव्य ‘शैक्षणिक हब’ बनवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
लोकमान्य टिळक नगरपरिषद शाळा क्र. २ येथे आयोजित या संयुक्त सोहळ्याला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, केंद्रीय विद्यालयाचे सहाय्यक आयुक्त के. शंकरय्या, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, मुख्याधिकारी वैभव गारवे आणि केंद्रीय विद्यालय अंबरनाथचे मुकेश कुमार सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. तर, खासदार सुनील तटकरे यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे (ऑनलाइन) उपस्थित राहून आपला संदेश दिला.
यावेळी बोलताना डॉ. सामंत म्हणाले की, यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मंजूर झालेल्या अवघ्या तीन केंद्रीय विद्यालयांपैकी एक विद्यालय आपल्या रत्नागिरीला मिळाले आहे, ही रत्नागिरीकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे सोमवारी सुरू झालेल्या या विद्यालयाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अवघ्या ७२ तासांत अत्यंत दर्जेदार स्वागतगीत बसवून ते सादर केले. हीच या शाळेच्या उच्च गुणवत्तेची पहिली पावती असल्याचे कौतुकोद्गार पालकमंत्र्यांनी काढले.
सध्या हे केंद्रीय विद्यालय टिळक विद्यालयाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले आहे. मात्र, नाचणे येथे या विद्यालयाच्या कायमस्वरूपी व अद्ययावत इमारतीसाठी केंद्र सरकारकडून तब्बल ४० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला असून, त्याचे बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती डॉ. सामंत यांनी दिली. या निधीबाबत त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या केंद्रीय विद्यालयात मातृभाषेला प्राधान्य दिले जाणार असून, विद्यार्थ्यांना आवर्जून मराठी भाषा शिकवली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यालयाने घेतला असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.



