रत्नागिरी : प्रतिनिधी
देशाच्या सीमेवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक १९, आंबेशेत येथील विद्यार्थ्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला. या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त स्वतःच्या हातांनी आकर्षक राख्या तयार करून त्या सीमेवरील जवानांसाठी पाठवल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रेमाने तयार केलेल्या या स्वनिर्मित राख्या आज डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. डाक विभागामार्फत या राख्या देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या शूर जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने राबवलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी देशरक्षण करणाऱ्या जवानांप्रती आपला आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.
हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र कणमुसे, उपशिक्षक विनय कांबळे, उपशिक्षिका वर्षा म्हादे आणि शिक्षक शुभम पेटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या जवानांची आठवण ठेवून राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांकडून रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक १९ च्या प्रशासनाचे तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले जात आहे.



