नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरलेला असतानाच, आता या प्रकरणाशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरातचा व्यावसायिक भागीदार आणि शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघातात शेळके यांच्या कुटुंबातील सदस्यही गंभीर जखमी झाले असून, या मृत्यूमुळे खरात प्रकरणातील गुपिते कायमची गाडली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कंटेनरला कारची धडक; भीषण अपघाताने शिर्डी हादरली
मिळालेली माहिती अशी की, जितेंद्र शेळके हे आपल्या कारने समृद्धी महामार्गावरून जात असताना त्यांच्या गाडीने पुढच्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा चक्काचूर झाला असून शेळके यांचा जागीच प्राण गेला. क्रेनच्या मदतीने गाडी कापून त्यांचा मृतदेह बाहेर काढावा लागला. त्यांच्या पत्नी आणि मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खरात आणि शेळकेंचे ‘आर्थिक’ धागेदोरे
जितेंद्र शेळके हे केवळ खरातचे निकटवर्तीय नव्हते, तर त्यांच्या बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात अशोक खरातची मोठी गुंतवणूक होती. खरातच्या दोन हजार कोटींच्या साम्राज्यात शेळके यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे बोलले जाते. खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या संपत्तीचा आणि गैरकृत्यांचा तपास सुरू असतानाच ही घटना घडली आहे.
अपघात की पूर्वनियोजित कट?
अशोक खरातच्या लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अनेक बड्या धेंडांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशा संवेदनशील वेळी मुख्य साक्षीदार आणि भागीदार असणाऱ्या शेळके यांचा अपघात होणे, ही केवळ योगायोग आहे की घातपात, यादृष्टीने आता पोलीस तपास करत आहेत.
शिर्डीतील एक प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या शेळके यांच्या निधनामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून, खरात प्रकरणाच्या तपासावर या घटनेचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



