रत्नागिरी : प्रतिनिधी
प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान विषयक पूर्व सूचनेनुसार दि. 6 मार्च ते 10 मार्च रोजी जिल्ह्यात उष्म व दमट हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मा लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
काय करू नये…
उन्हात अति कष्टाची कामे करू नका. मादक पेय चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.
दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.गडद पट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.



