रत्नागिरी : प्रतिनिधी
पावसाने ऐन हंगामात मारलेली दडी आणि वाढत्या तापमानामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या संकटाची गंभीर दखल घेत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे गावातील कातळवाडी तसेच डुगवे परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांना प्रशासनातर्फे सर्वतोपरी मदतीचा दिलासा दिला.
पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. वरून पीक हिरवेगार दिसत असले तरी, भाताच्या लोंब्यांमध्ये दाणा भरलेला नाही, त्या पूर्णपणे पोकळ आणि चिंब झाल्या आहेत. नेहमी १२ ते १८ फुटवे येणाऱ्या रोपांना पाण्याअभावी केवळ ५ ते ७ फुटवे आले आहेत. शिवाय, पिकावर कडा करपा, काजळी आणि बुरशीजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. तब्बल २५ वर्षांनंतर जिल्ह्यात अशी भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक शेतकरी चंद्रकांत फुटक, कृष्णा फुटक यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
यावर जिल्हाधिकारी जिंदल यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाने या दुष्काळसदृश परिस्थितीची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १२०० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित गावांमधील पंचनामे येत्या एक-दोन आठवड्यांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ई-पीक पाहणीसाठी नेटवर्क नसल्यास ॲपमध्ये ऑफलाइन माहिती भरण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पंचनाम्यांचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करून नुकसानभरपाई लवकरात लवकर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तसेच, आगामी काळात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास एप्रिल ते जून महिन्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते. यावर मात करण्यासाठी प्रत्येक गावाचे आतापासूनच ‘वॉटर बजेटिंग’ (पाणी अंदाजपत्रक) तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ऑक्टोबरमध्येच टंचाई आराखडा तयार करून गरजेनुसार विंधण विहिरी उपलब्ध करून देण्याचे नियोजनही प्रशासनाकडून केले जाणार आहे. या पाहणी दौऱ्यात कृषी अधिकारी शिवकुमार सदाफले, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.



