चिपळूण : प्रतिनिधी
तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून का वगळण्यात आले, भातशेतीवरील ‘हळद्या’ रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर उपस्थित झालेले प्रश्न, या महत्त्वाच्या मुद्द्यांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे. यासंदर्भात चिपळूण तालुका शाखेच्या वतीने प्रशासनाला दोन स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आली आहेत.
तालुकाप्रमुख बळीराम गुजर आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव (बाळा) कदम यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार व प्रभारी प्रांताधिकाऱ्यांना ही निवेदने देण्यात आली. दुष्काळ जाहीर करण्यासाठी वापरण्यात आलेले पर्जन्यमान, पीकस्थिती आणि जमिनीतील ओलावा या निकषांचा अधिकृत अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यात करण्यात आली आहे. तसेच महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने गावनिहाय फेरपडताळणी करून पीकनुकसानीचे योग्य मूल्यांकन करावे, असे शिवसेनेने म्हटले आहे. याशिवाय, कृषी विभागाला दिलेल्या निवेदनात भातपिकावरील ‘हळद्या’ रोगाची प्रत्यक्ष पाहणी करून कृषी तज्ज्ञांमार्फत त्याचे शास्त्रीय निदान करण्याची आग्रही मागणी केली आहे.
यासोबतच, निवडणूक प्रक्रियेबाबत माध्यमांतून समोर आलेल्या विविध वृत्तांची गंभीर दखल घेत या प्रकरणाची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी व्हावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी सचिन कदम, पार्थ जागुष्टे, तीर्था लाड, सचिन चोरगे, सचिन शेट्ये, संदीप राणे, संजय रेडीज, मनोज पांचाळ, राजू विखारे, अजित गुजर, सुरेंद्र शिंदे, संदीप चव्हाण, दीपक कदम आणि गंगाराम पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.



