मुंबई: नाशिक येथील टीसीएस (TCS) कंपनीशी संबंधित प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) गठित केलेल्या चौकशी समितीचा सविस्तर अहवाल आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा, सन्मान आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी या अहवालात महत्त्वपूर्ण निष्कर्ष आणि शिफारसी नोंदवण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, हरियाणाचे माजी पोलीस महासंचालक बी.के. सिन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील मोनिका अरोरा आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या वरिष्ठ समन्वयक सुश्री लीलाबती यांचा समावेश होता.
या अहवालात टीसीएस नाशिक प्रकरणातील नेमक्या त्रुटींवर प्रकाश टाकण्यात आला असून, भविष्यात महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी कंपन्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. हा अहवाल स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय पावले उचलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



