रत्नागिरी : प्रतिनिधी
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, जिल्ह्यात संरक्षण, पर्यटन आणि हरित ऊर्जा क्षेत्रावर आधारित अनेक भव्य प्रकल्प साकारणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उद्योजकांच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या बैठकीत जिल्ह्यात सुमारे ७,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ‘ग्रीन स्टील’ प्रकल्प उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून, यातील एक प्रकल्प राजापूर येथे तर दुसरा रत्नागिरीत उभारला जाणार आहे. याशिवाय, रत्नागिरीतील पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी आगामी वर्षभरात ‘सी-प्लेन’ (Sea Plane) सेवा प्रत्यक्षात आणली जाईल, तसेच समुद्रकिनाऱ्यालगत वाटद किंवा लगतच्या परिसरामध्ये एक भव्य ‘शिपयार्ड’ आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित मोठा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात लवकरच सुरू होणारा सीएनजी (CNG) प्रकल्प नागरिकांच्या दृष्टीने ‘गेम चेंजर’ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, पूर्वी नियोजित असलेल्या ३८,००० कोटी रुपयांच्या ‘व्हीआयटी सेमीकंडक्टर प्रकल्पाबाबत’ स्पष्टीकरण देताना डॉ. सामंत म्हणाले की, अमेरिकेतील काही घडामोडींमुळे या प्रकल्पाला काहीसा विलंब झाला असून त्याचे मूल्यही कमी झाले आहे; त्यामुळे या प्रकल्पाला आवश्यक तेवढीच जागा देऊन उर्वरित अतिरिक्त जागा इतर नवीन उद्योगांसाठी वापरण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या उच्चस्तरीय बैठकीला आमदार किरण सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सह मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्यासह विविध नामांकित कंपन्यांचे संचालक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



