मुंबई :
नालासोपारा येथील कळंब गावाजवळ असलेल्या तुलसी रिसॉर्टमध्ये उशिरा रात्री पार पडलेल्या एका दारूच्या पार्टीदरम्यान भाजप सरपंचाच्या पतीने हवेत अंधाधुंध गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी संदेश गुरव याला अटक केली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही, मात्र रिसॉर्ट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
भिवंडी तालुक्यातील कवाडखुर्द ग्रामपंचायतीच्या भाजप सरपंचा मयुरी गुरव यांचे पती संदेश गुरव (वय ३२ वर्षे) हे आपल्या मित्रांसह पार्टीसाठी तुलसी रिसॉर्टमध्ये आले होते. बांधकाम साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय करणारे संदेश यांनी उशिरा रात्री साडेएकच्या सुमारास दारूच्या नशेत आणि अतिउत्साहात स्वतःजवळील बेकायदेशीर देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला.
त्याच वेळी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलीस बीट मार्शल यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि त्यांनी त्वरित रिसॉर्ट गाठून अर्नाळा सागरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता त्यांना रिकामे काडतूस सापडले, तसेच अधिक चौकशी केली असता आरोपी संदेश गुरव याच्याकडून विनापरवाना देशी रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले असून हे बेकायदेशीर शस्त्र त्याच्याकडे कुठून आणि कसे आले, याचा तपास पोलीस करत आहेत.



