मुंबई : मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पोस्ट विभाग हा केवळ सेवा देणारा विभाग नसून तो भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे. गरीब-श्रीमंत किंवा जात-धर्म असा कोणताही भेदभाव न करता पोस्टाची सेवा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. कारगिल युद्धासारख्या कठीण काळातही वीर जवानांचे निरोप त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवणारे पोस्टमन हे खऱ्या अर्थाने मानवी संवेदनांचे वाहक ठरले आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘वारसा आणि विकास’ या संकल्पनेतून पोस्ट विभागाने आधुनिकतेची कास धरली आहे. इंटरनेट, एसएमएस आणि ई-मेल अशा तंत्रज्ञानामुळे तसेच खासगी कुरिअर सेवांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना पोस्ट विभागाने सक्षमपणे तोंड दिले आहे. विभागाने आधार सेवा, बँकिंग आणि ऑटोमॅटिक पार्सल सेवा यांसारख्या आधुनिक सुविधांचा स्वीकार करून स्वतःमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणले आहे. या परिवर्तनामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पोस्ट विभागाच्या विस्ताराची माहिती देताना सांगितले की, देशातील दीड लाख पोस्ट कार्यालयांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या सेवेला नेहमीच प्राधान्य दिले जाते. सध्या पोस्ट लाईफ इन्शुरन्समध्ये दीड कोटी खाती असून त्यात सुमारे दोन लाख कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. तसेच पोस्ट बँकेत ४० कोटी खाती उघडण्यात आली असून, या माध्यमातून विभागाने जनतेचा मोठा विश्वास संपादन केला आहे. कार्यक्रमादरम्यान अंधेरी आर.एस. पोस्ट ऑफिसचे लोकार्पण आणि आधार सेवा केंद्राची पाहणी करण्यात आली. तसेच ‘जन सेवा कनेक्ट’ उपक्रमावरील विशेष पोस्टल कव्हरचे प्रकाशनही करण्यात आले. या सोहळ्याला आमदार अमित साटम, आमदार हारून खान आणि पोस्ट विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



