कळवा : अशोक घाग
प्रभाग क्रमांक २३ चे लोकनेते स्वर्गीय मुकुंद केणी यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. माजी नगरसेविका प्रमिलाताई केणी आणि माजी नगरसेवक मंदार मुकुंद केणी यांच्या वतीने सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी या मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना प्रमिलाताई केणी म्हणाल्या की, यंदा या उपक्रमाचे १५ वे वर्ष असून, स्वर्गीय मुकुंद केणी यांच्या समाजसेवेचा वारसा अविरतपणे पुढे चालवण्याचा आमचा मानस आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे, गरजूंच्या चेहऱ्यावर विश्वास निर्माण करणे आणि लोकहिताला नेहमी प्राधान्य देणे हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख होती, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. स्वर्गीय मुकुंद केणी यांनी केलेली निस्वार्थ समाजसेवा आणि जनतेशी जपलेले आत्मीय नाते आजही प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या मनात जिवंत असल्याचे यावेळी दिसून आले. या उपक्रमामुळे पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील नागरिकांनी केणी परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे.




