रत्नागिरी : प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे, तर ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. राजधानी मुंबईसह पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांवर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर ढगफुटीसदृश मुसळधार पावसाचा धोका असल्याने तिथे ‘ऑरेंज अलर्ट’, तर कोल्हापूरच्या घाटात ‘यलो अलर्ट’ लागू करण्यात आला आहे. नाशिकच्या पर्वतीय भागांतही जोरदार पावसाची शक्यता असल्याने पर्यटकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्यातरी विदर्भात पावसाचा कोणताही मोठा अलर्ट देण्यात आलेला नाही.



