रत्नागिरी : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत असताना पाली येथे त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या या अनपेक्षित एक्झिटमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.
राजेश सावंत हे भाजपचे निष्ठावान आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेले नेते म्हणून ओळखले जात. दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहताना त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, उत्तम संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांसोबतचा जिव्हाळा यामुळे त्यांनी राजकीय वर्तुळात स्वतःची एक वेगळी आणि आदरणीय ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने एक अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे.
सावंत यांच्या अचानक जाण्याने सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त होत असून, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, उद्या त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.



