मुंबई: प्रतिनिधी
बॉलीवूडमधील नुकताच प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘धुरंधर’ (Dhurandhar) मधील अभिनेता नदीम खान (Nadeem Khan) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या घरात काम करणाऱ्या ४१ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून गेल्या १० वर्षांपासून वारंवार बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या अनेक वर्षांपासून विविध कलाकारांच्या घरी घरकाम करते. २०१५ मध्ये तिची ओळख नदीम खानशी झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर नदीमने तिला लग्नाचे आश्वासन दिले. याच आश्वासनाच्या जोरावर त्याने गेल्या १० वर्षांत मालाडमधील मालवणी आणि वर्सोवा येथील निवासस्थानी तिच्यावर अनेकदा अत्याचार केले.
महिलेने जेव्हा लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा नदीमने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांची कारवाई
महिलेने सुरुवातीला वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, अत्याचाराची पहिली घटना मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा ‘झिरो एफआयआर’ (Zero FIR) अंतर्गत मालवणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी २२ जानेवारी २०२६ रोजी नदीम खानला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.



