मुंबई: प्रतिनिधी
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवास आता सामान्यांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर २४ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी एका ३३ वर्षीय प्राध्यापकाची केवळ किरकोळ धक्का लागल्याच्या वादातून हत्या करण्यात आली. आलोक कुमार सिंग असे या दुर्दैवी प्राध्यापकाचे नाव असून ते विलेपार्ले येथील प्रसिद्ध एन. एम. महाविद्यालयात गणित विषयाचे अध्यापन करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, आलोक सिंग हे कॉलेज संपवून घरी जाण्यासाठी लोकलमधून उतरत असताना त्यांचा आरोपी ओंकार एकनाथ शिंदे याच्याशी धक्का लागल्यावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने आपल्या खिशातून मेटल पॉलिशिंगसाठी वापरले जाणारे एक धारदार अवजार काढले आणि भर स्थानकावर प्रवाशांच्या डोळ्यांदेखत आलोक यांच्या पोटात खुपसले.
या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच दिवशी आलोक सिंग यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ते त्या दिवशी महाविद्यालयातून लवकर निघाले होते, मात्र घरी पोहोचण्याआधीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आलोक यांचे वडील देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या ताफ्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. या घटनेनंतर बोरीवली लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या १२ तासांत आरोपी ओंकार शिंदे याला मालाडच्या कुरार व्हिलेजमधून बेड्या ठोकल्या. या धक्कादायक प्रकारामुळे मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला असून, किरकोळ कारणावरून होणाऱ्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.







