मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मान्सूनच्या आगमनाची जोरदार चाहूल लागली असतानाच अरबी समुद्रातील हवामानातील घडामोडींनी हवामान तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनचे (चक्रवातीय स्थिती) कमी दाबाच्या क्षेत्रात आणि पुढे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे मान्सूनच्या पुढील प्रवासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ आणि महाराष्ट्र किनारपट्टीपासून काही अंतरावर अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाले असून या प्रणालीची टर्फ लाईन महाराष्ट्राच्या किनारपट्टीला स्पर्श करत उत्तरेकडे सरकत आहे. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ निर्माण झालेली ही स्थिती पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होऊ शकते.
सध्याचे सायक्लोनिक सर्क्युलेशन लवकरच कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होऊन त्यानंतर ते अधिक तीव्र होत चक्रीवादळाचे स्वरूप धारण करू शकते. हवामान विभाग आणि तज्ज्ञ या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ही हवामान प्रणाली समुद्राच्या आतल्या भागात किंवा गुजरातच्या दिशेने सरकण्याची शक्यता असून, १५ जूनच्या आसपास या संदर्भातील चित्र अधिक स्पष्ट होईल. एकीकडे हे संकट असले तरी मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, मुंबई आणि उपनगरांमध्ये १० जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता कायम आहे. सद्यस्थितीत वातावरण मान्सूनसाठी अनुकूल असून सुरुवातीच्या टप्प्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
दरम्यान, कोकण किनारपट्टीसह मुंबई परिसरात ११ आणि १२ जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू शकतो, त्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना मात्र मान्सूनसाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या रिमझिम सरी कोसळतील, तर उत्तर महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये ४ जून रोजी आणि महाराष्ट्रात ६ जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर त्याची वाटचाल वेगाने सुरू असली तरी, अरबी समुद्रातील संभाव्य चक्रीवादळामुळे या प्रवासात अडथळे येऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.







