नागपूर: मुंबई उच्च न्यायालयातील सहा अतिरिक्त न्यायमूर्तींना सेवेत कायम करण्यात आले असून त्यांनी मंगळवारी, ९ जून रोजी स्थायी न्यायमूर्ती म्हणून अधिकृत शपथ घेतली. कायम करण्यात आलेल्या न्यायमूर्तींमध्ये निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबाळकर, रोहित जोशी (सर्व नागपूर), प्रवीण पाटील (अमरावती), अद्वैत सेठना (मुंबई) आणि अश्विन भोबे (गोवा) यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांची २७ जानेवारी २०२५ रोजी, तर उर्वरित पाच न्यायाधीशांची २५ ऑक्टोबर २०२४ रोजी अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. वास्तविक पाहता अतिरिक्त न्यायमूर्ती पदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो आणि त्यानंतरच त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांना कायम केले जाते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच या सहाही न्यायमूर्तींना सेवेत कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कॉलेजियमने १८ मे रोजी केंद्र सरकारकडे पाठवलेल्या शिफारशीवर ६ जून रोजी शिक्कामोर्तब करण्यात आले, ज्यानंतर आता हे सर्व न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयात कायमस्वरूपी सेवा बजावतील.



