मुंबई:
मुंबईच्या आणिक बेस्ट बस डेपोमध्ये सोमवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत १० वातानुकूलित (AC) सीएनजी बस जळून पूर्णपणे खाक झाल्या. सुदैवाने या भयानक दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जळालेल्या सर्व बस ‘डागा’ नावाच्या कंत्राटदाराच्या मालकीच्या होत्या, ज्यामध्ये ६ नवीन आणि ४ जुन्या बसचा समावेश होता.
मुंबई अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास डेपोमध्ये उभ्या असलेल्या एका रिकाम्या सीएनजी बसमध्ये अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केले आणि आकाशात काळ्या धुरात लोट दूरवर दिसू लागले. सुरुवातीला तेथे उपस्थित असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र वाढलेली उष्णता आणि तीव्र ज्वालांमुळे आग वेगाने पसरली.
अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीच्या तडाख्यात आसपास उभ्या असलेल्या इतर ९ बसही जळू लागल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत एकूण १० वातानुकूलित बस जळून राख झाल्या होत्या. अग्निशामक दलाने जरी याला किरकोळ श्रेणीची (लेवल-१) आग घोषित केले असले, तरी या अग्निशामक दुर्घटनामुळे कंत्राटी बसचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संपूर्ण दुर्घटनेत कोणikही जखमी झाल्याचे वृत्त नाही.







