मुंबई :
महाराष्ट्रात ऑटो, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालवणाऱ्या अमराठी चालकांना आता मराठी शिकावीच लागेल. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालकांना सक्त आवाहन केले आहे की, त्यांनी कोणत्याही कायदेशीर स्थगितीचे (स्टे) कारण पुढे करून मराठी शिकणे टाळू नये. त्यांनी सर्व अमराठी चालकांना ‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन व्यावहारिक मराठी शिकण्याचा आग्रह केला आहे.
परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या विद्यमाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबवले जात आहे. याच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील १८० हून अधिक केंद्रांवर जवळपास १,८०० शिक्षकांच्या माध्यमातून १.६५ लाखांहून अधिक अमराठी चालकांना यशस्वीपणे मराठी शिकवण्यात आली आहे.
परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, राज्यात अद्यापही ८ ते ९ लाख अमराठी चालक कार्यरत आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीच अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मर्यादित वेळेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देणे हे एक आव्हान आहे. त्यामुळे, ज्या चालकांनी अद्याप मराठी शिकलेली नाही, त्यांनी त्वरित प्रशिक्षण वर्गांमध्ये आपली नोंदणी करावी किंवा ऑनलाइन माध्यमातून मराठी शिकावी.



