नई दिल्ली :
दिल्लीतील ‘इंडिया’ आघाडीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांशी झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यावर किमान तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याच्या कलमांखाली हे गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदार याद्यांच्या फेरतपासणीला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी आक्रमक आंदोलन छेडले. दुपारच्या भोजनानंतर सर्व खासदार एका बसमधून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघाले असताना पोलिसांनी विंडसर पॅलेसजवळ त्यांना अडवले. यानंतर राहुल गांधींसह सर्व खासदारांनी बसमधून खाली उतरून रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी प्रियंका गांधी हातात संविधानाची प्रत घेऊन रस्त्यावर बसल्या होत्या. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता राहुल गांधींनी पोलिसांना रोखत तीव्र विरोध दर्शवला.
या आंदोलनादरम्यान पोलीस आणि खासदारांमध्ये मोठी झटापट झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये प्रियंका गांधी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला कथितरित्या ढकलत असल्याचे, तर एका आंदोलकाने पोलिसाला लाथ मारल्याचे दिसत आहे. या गोंधळात कॉन्स्टेबल अंकित कसाना जखमी झाले. दुसरीकडे, पोलिसांच्या कारवाईत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या चेहऱ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्या रक्तबंबाळ झाल्याचे समोर आले आहे.
या संपूर्ण राड्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी नेत्यांना पुन्हा एकदा ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करत काँग्रेसने गुरुवारी देशभरात राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर तीव्र आंदोलने करण्याची हाक दिली आहे. या घडामोडींमुळे आगामी काळात सरकार आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत.




