पुणे: प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी मतमोजणी प्रक्रियेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतदानाची अंतिम आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणीवेळी समोर आलेले आकडे यामध्ये मोठी तफावत असल्याचे मोरेंनी निदर्शनास आणून दिले आहे. या विसंगतीमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, हा निकाल लोकशाहीचा नसून निवडणूक अधिकाऱ्यांच्या ‘विशिष्ट’ कार्यपद्धतीचा असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
वसंत मोरे यांच्या दाव्यानुसार, मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाकडून आलेल्या अधिकृत पत्रकानुसार एकूण ७९,८२६ मतदान झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र मतमोजणीच्या दिवशी ही संख्या ७८,७१९ इतकीच कशी भरली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, मोरे यांचा पराभव १०१० मतांनी झाला असून, आयोगाच्या आकडेवारीतून गायब झालेली मते ही सुद्धा साधारण तितकीच असल्याने त्यांनी यामागे मोठे षडयंत्र असल्याची शक्यता वर्तवली आहे. मतदानाच्या दिवशी शेवटच्या दोन तासात अचानक वाढलेले १६ टक्के मतदान आणि मोजणीच्या दिवशी कमी झालेली मते यांचा मेळ बसत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर त्यांच्या पराभवाबाबत आणि त्यांना मिळालेल्या मतांबाबत सुरू असलेल्या चुकीच्या प्रचारावरही मोरेंनी संताप व्यक्त केला आहे. त्यांना केवळ ६६६ मते मिळाल्याची अफवा पसरवली जात असताना, त्यांनी आपल्याला २०,८६८ मते मिळाल्याचे स्पष्ट करत विरोधकांवर टीका केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या विसंगतीवर दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचे सांगत, आता या अन्यायाविरुद्ध आपण शांत बसणार नाही आणि पुराव्यासह न्यायालयात दाद मागणार असल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. या आक्षेपामुळे आता पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.







