कल्याण:
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या १७ वर्षांपासून चर्चेत असलेल्या वसंत डावखरे मानहानी खटल्यात आज मोठा निकाल लागला आहे. कल्याण न्यायालयाने या प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान २० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. तसेच, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपले जबाब नोंदवले होते.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर दाखल झालेल्या या खटल्यात न्यायालयाने पुरावे आणि युक्तिवादांची बारकाईने तपासणी करून हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला. तब्बल १७ वर्षांनंतर न्याय मिळाल्याचा आनंद आहे, मात्र दिवंगत वसंत डावखरे यांच्याबद्दलचा आदर कायम राहील, अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली. हा खटला राजकीय आकसापोटी दाखल करण्यात आला होता आणि साक्षीदारांच्या जबाबांमध्ये अनेक विसंगती होत्या, असा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांचे वकील जयेश वाणी यांनी केला. न्यायालयाचा हा निकाल म्हणजे ‘सत्याचा विजय’ असल्याचेही ते म्हणाले.
या वादाची खरी सुरुवात २००९ च्या लोकसभा निवडणुकीत झाली होती, जेव्हा वसंत डावखरे आणि आनंद परांजपे यांच्यात अटीतटीची लढत होती. निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता. ज्यामध्ये डावखरे कथितरित्या आपल्या कार्यकर्त्यांना पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती मनातून काढून टाकून काम करण्याचे आवाहन करत असल्याचे दिसत होते. याच व्हिडिओला आधार बनवून हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. अखेर या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर सर्व नेत्यांची यातून मुक्तता झाली आहे.



