मुंबई: प्रतिनिधी
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिस्तीचा बडगा उगारत पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांच्या मतदारसंघातील २९ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, निवडणुकांच्या तोंडावर हा अनिल परब यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
बंडखोरी भोवली; ‘मातोश्री’वरून थेट कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे (पूर्व) आणि सांताक्रूझ परिसरातील या २९ पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात भूमिका घेतली होती. काही पदाधिकाऱ्यांनी स्वतः अपक्ष अर्ज दाखल केले होते, तर काही जण छुप्या पद्धतीने बंडखोर उमेदवारांना मदत करत असल्याच्या तक्रारी ‘मातोश्री’वर पोहोचल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी या सर्वांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले.
अनिल परबांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?
अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. मात्र, ज्या २९ जणांवर कारवाई झाली आहे, त्यामध्ये परब यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे शेखर वायंगणकर यांचाही समावेश आहे. स्वतःच्या बालेकिल्ल्यातच कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्याने परबांची डोकेदुखी वाढली आहे. शिस्तभंग करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.



