मुंबई : प्रतिनिधी
मिलावटी रक्त भगवा हाती घेऊ शकत नाही आणि आता लोकशाहीवरील विश्वास उडत चालला आहे, असा सणसणीत टोला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. आपण मशाल किंवा तुतारी समोरील बटण दाबण्याचे आवाहन करतो, मात्र भाजपवाले कोणतेही बटण दाबा, माणूस आमच्याकडेच येणार असे सांगतात, अशी टीका करत आता देशाला आणि आपल्यालाच ‘कमळ मोहीम’ (भाजपविरोधी मोहीम) राबवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. शिवसेनेच्या साठाव्या स्थापना दिन सोहळ्यात बोलताना त्यांनी पक्ष सोडणाऱ्या खासदारांवर आणि ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त केला. प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगत त्यांनी स्वतःवर, पत्नीवर आणि मुलांवर होणाऱ्या चिखलफेकीचा जाब विचारला आणि बंडखोरी झालेल्या मतदारसंघातील मतदारांची जाहीर माफी मागितली. पंतप्रधानांच्या नावाचा वापर न करताही नऊ खासदार निवडून आल्यानंतरही केवळ सत्तेच्या भुकेपोटी झालेली ही तोडफोड निषेधार्ह असल्याचे सांगत त्यांनी, सोन्यासारखी शिवसेना चोरांच्या हाती जाऊ देणार नाही आणि आपण संकटातही पर्वतासारखे खंबीर उभे आहोत, असा विश्वास शिवसैनिकांना दिला.
छत्रपती, वारकरी आणि हिंदूंच्या भगव्यावर इतर कोणतेही चित्र आपल्याला मान्य नाही, असे स्पष्ट करत त्यांनी भाजप देशात ‘एक देश, एक निवडणूक’च्या नावाखाली ‘एक पक्ष, निवडणूक बंदी’ आणू पाहत असल्याचा आरोप केला. पश्चिम बंगालमध्ये सुरक्षा दलांचा वापर करणाऱ्या सरकारने तोच जोर मणिपूर आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये का दाखवला नाही, असा सवाल करत देशहिताच्या निर्णयांना आपला नेहमीच पाठिंबा असेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच पक्ष फोडण्याऐवजी आणि फसवणूक करण्याऐझवी आम्हाला चर्चेला बोलवा, आम्ही काय पाकिस्तानी आहोत का, असे विचारत त्यांनी आपली देशभक्ती सिद्ध केली. शेतकऱ्यांना मालाला हमीभाव मिळत नसताना लोकप्रतिनिधींचे भाव मात्र ठरलेले आहेत आणि राज्य सरकारची कर्जमाफी पूर्णपणे खोटी आहे, अशी टीका त्यांनी केली. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’तील ऐंशी लाख भगिनींचे पैसे सरकारने नंतर परत काढून घेतल्याचा गंभीर आरोप करत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला.



