नवी दिल्ली :
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांना उद्देशून एक महत्त्वाचा व्हिडिओ संदेश जारी केला आहे.
“पेपरफुटी हा काही साधा विषय नाही. या प्रकरणी शुक्रवारी आणखी मोठी आणि कठोर कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट संकेत पंतप्रधान मोदी यांनी या संदेशात दिले आहेत. त्यामुळे आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होणार का, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
मागील अडीच महिन्यांपासून देशभरात पेपरफुटीच्या घटनांवरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री उशिरा पंतप्रधानांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत, पेपरफुटीविरोधात आणखी कठोर पावले उचलण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा होणार असल्याचे सांगितले. गेल्या अडीच महिन्यांत सरकारने या मुद्द्यावर अनेक पावले उचलल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना पंतप्रधानांनी मध्यरात्री असा संदेश जारी केल्यामुळे सरकार नेमका कोणता मोठा निर्णय घेणार, याबाबत राजकीय आणि विद्यार्थी वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर जोरदार आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या दबावामुळे विरोधकांनीही केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या या संदेशानंतर शुक्रवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षणमंत्र्यांच्या भूमिकेबाबत किंवा राजीनाम्याबाबत निर्णय होणार का आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार का, याविषयी आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
शुक्रवारी सीजेपीचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. गुरुवारी जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सरकार चर्चेसाठी पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, “मंत्र्यांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात चर्चा होणार नाही, तर चर्चा एकतर जंतर-मंतरवर होईल किंवा एखाद्या तटस्थ ठिकाणी होईल,” अशी भूमिका सीजेपीने घेतली होती. या पार्श्वभूमीवर, आता सीजेपीचे शिष्टमंडळ सरकारच्या प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

